पंचक्रोशीत रोकडोबा देवस्थान हे प्रसिद्ध देवस्थान आहे. दर शनिवारी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिर परिसरामध्ये अनेक देवदेवतांची मंदिरे असून, त्यात दत्त मंदिर, गुरुवर्य राम महाराज यांची समाधी, लक्ष्मीनारायण मंदिर, पशुपतिनाथ महाराज मंदिर, राधाकृष्ण मंदिर, बिरूदेव मंदिर, बाळूमामा मंदिर, रेणुका मंदिर आदी मंदिरे असून, या मंदिर परिसरामध्ये वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये मंदिर प्रवेशद्वार ते मंदिरापर्यंत दुतर्फा तसेच मंदिर सभागृह परिसर, मंगल कार्यालय परिसर, आदी ठिकाणी सप्तपर्णी, नारळ, शंखासूर, वड, पिंपळ, बॉटमपाम, पांडा पाईक्स, बकूळ आदी वृक्षांसह अनेक शोभिवंत सहाशे वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. हे वृक्ष दर्शनासाठी येणा-या भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
आंध्रप्रदेशातून आणलेल्या रोपांची लागवड...
आंध्रप्रदेशमधील राजमंदरी येथून वृक्षांची रोपे मागवण्यात आली होती. या वृक्षांना दररोज सकाळ-संध्याकाळ पाणी घालण्याचे व देखभालीची काम वैजनाथ मेकळवाड व पप्पू काळे हे करीत असून, या मंदिराचे अध्यक्ष किशन महाराज व भानुदास कांबळवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या वृक्षांची जोपासना केली जात आहे. वृक्षराजीमुळे मंदिर परिसराला निसर्गरम्य असे वातावरण प्राप्त झाले आहे.