जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्याच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या वतीने नियम अधिक कडक केले जात आहेत. दरम्यान, ६० वर्षांपुढील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. येथील आधार वृध्दाश्रमातील ७० वर्षांपुढील १० ज्येष्ठांना कोविड लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्ष मनीषा होळकुंदे यांनी दिली.
दरम्यान, ५ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे चाचणीत आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य व पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच आरोग्य विभागाकडून लसीकरणावर भर देण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हॉटेल, पानटपरी पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. येथील आठवडा बाजारही बंद ठेवण्यात आला आहे. १ ते १५ एप्रिल या कालावधीत गावात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असल्याची माहिती येथील पीएसआय रेवनाथ ढमाले यांनी दिली. नागरिकांनी गर्दीत जाऊ नये. स्वच्छता बाळगावी. मास्कचा वापर करावा. फिजिकल डिस्टन्स ठेवावा, असे आवाहन डॉ. के.डी. गवळी यांनी केले आहे.