महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवर प्रशासकीयदृष्ट्या दुर्लक्षित असलेला कासारशिरशीचा परिसर पूर्वी विधानसभेसाठी निलंगा मतदारसंघात जोडला होता. आता या भागातील कासारशिरसी, सरवडी, कासार बालकुंदा व मदनसुरी ही चार महसूल मंडळे औसा मतदारसंघास जोडली आहेत. लोकसभेसाठी उस्मानाबाद मतदारसंघात समावेश केल्याने, या भागातील जवळपास ७० गावांची अपेक्षित प्रशासकीय प्रगती झाली नाही.
कासारशिरसी हे पोलीस ठाण्याचे ठिकाण असून, या अंतर्गत चार जिल्हा परिषदेचे गट आहेत. या भागातील नागरिकांना प्रशासकीय, न्यायालयीन व इतर कामासाठी निलंग्यास जावे लागते. निलंगा तहसीलवरील ताण कमी करणे व गर्दी टाळण्याच्या दृष्टीने कासारशिरसीस तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी जुनी आहे.
आमदार अभिमन्यू पवार यांनी कासारशिरसी तालुका निर्मिती हा विकासाचा केंद्रबिंदू मानून, येथे राज्य सरकारने अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याची मागणी महसूलमंत्र्यांकडे केली आहे.
आ.अभिमन्यू पवार यांनी यापूर्वी महसूलमंत्री थोरात यांची भेट घेऊन कौटुंबिक वाटणी व शेतजमीन खरेदी-विक्री व्यवहारात दस्तऐवज नोंदणी करताना नकाशावरील रस्त्याचे क्षेत्र नसताना पर्यायी लांबी व चतु:सीमा आदी बाबींचा उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी केली होती. आ.पवार यांच्या दोन्ही मागण्यांचा निश्चित विचार करू, आश्वासन थोरात यांनी दिले आहे.