उदगीर : उदगीर शहर पोलिसांनी चोरट्यांकडून ६ दुचाकी जप्त केल्या असून, याप्रकरणी दोन चोरट्यांना अटक केल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नानासाहेब उबाळे यांनी गुरुवारी दिली.
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या ५ दुचाकी व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेली एक दुचाकी अशा एकूण ६ दुचाकी (किंमत अंदाजे ३ लाख रुपये) सराईत मोटारसायकल चोरांकडून शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नानासाहेब उबाळे व कर्मचाऱ्यांनी जप्त केल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन यांचे मार्गदर्शनाखाली ही शोधमोहीम राबविण्यात आली. या मोहिमेसाठी शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील श्रीकृष्ण चामे, योगेश फुले, राजू घोरपडे, गजानन पुल्लेवाड, विपीन मामाडगे, पोलीस हवालदार संजय दळवे, मनोहर राठोड, धनाजी शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
पोलीस निरीक्षक उबाळे म्हणाले, ज्यांनी जुन्या दुचाकी खरेदी केल्या आहेत व त्यांना अद्याप विकणाऱ्यांनी मूळ अथवा झेरॉक्स कागदपत्रे दिलेली नाहीत, त्या दुचाकी चोरीच्या असू शकतात. त्यामुळे अशा प्रकारच्या अंशतः रक्कम देऊन खरेदी केलेल्या जुन्या दुचाकी ज्यांच्याकडे असतील व त्या दुचाकींची कागदपत्रे संबंधितांकडे नसतील तर त्यांनी तत्काळ ही वाहने उदगीर शहर पोलीस ठाण्यात हजर करावीत. या दुचाकी चोरीच्या नसल्याबाबत खात्री करुन घ्यावी. अन्यथा पोलीस विभागाला अशा दुचाकी सापडल्यास कारवाई होऊ शकते.