लातूर : राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावांमध्ये गुरुवारपासून शाळा सुरू झाल्या असून, अनेक शाळांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी १०७ शाळा सुरू झाल्या असून, त्यात ६ हजार ५२ विद्यार्थी उपस्थित राहिले. अनेक शाळांमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र आणि पालकांची सहमती पत्र असलेल्या १०७ शाळा सुरू झाल्या. त्यामध्ये लातूर तालुक्यातील (कंसात विद्यार्थी उपस्थिती) ११ (७२७), उदगीर १६ (६६१), देवणी ११ (६५६), शिरूर अनंतपाळ ८ (४५९), निलंगा ११ (७१६), औसा १५ (१२७४), अहमदपूर १६ (५८०), जळकोट ६ (२३९), चाकूर ६ (४०६), रेणापूर ७ (३३४) अशा १०७ शाळांमध्ये ६ हजार ५२ विद्यार्थी उपस्थित होते. तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून १,३०५ जणांनी पहिल्या दिवशी कर्तव्य बजावले.
ना हरकत व संमतीपत्र घेणे सुरू
कोरोनामुक्त झालेल्या गावांमध्ये शाळा सुरू करण्याचे निर्देश शासनाचे आहेत. त्यानुसार शाळा सुरू झाल्या आहेत. ज्या गावांमध्ये रुग्णसंख्या नाही, त्या ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन पालकांची संमती घेतली जात आहे. मुख्याध्यापक, शिक्षकांकडून संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचे काम अद्यापही सुरू आहे. कोरोना नियमांचे अनुपालन करून शाळेचा पहिला दिवस ग्रामीण भागात उत्साहात सुरु झाल्याचे शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी सांगितले.
शिक्षकांनी केले मुलांचे स्वागत
लातूर शहरालगत असलेल्या मळवटी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात ४५ टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली. मुख्याध्यापक युवराज शिंदे यांनी विद्यार्थी शाळेत आल्यानंतर त्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. सॅनिटायझर, ऑक्सिमीटर तपासणी व थर्मल स्क्रिनिंग करून वर्गात प्रवेश देण्यात आला. यावेळी उमाकांत धोंडजी, सुहास माकणीकर, जाफरअली सय्यद, विलास गिरी, मंजुषा शिंदे, मधुकर गरड, रंगनाथ माळी, बिटाजी भोसले, सुनील आगलावे, आदींची उपस्थिती होती.