आपल्या व्यवसायाच्या जाहिराती लावण्यासाठी अनेक व्यापारी शहरातील झाडांना खिळे मारत आहेत. वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने २०१८ पासून शहरात खिळेमुक्त झाड अभियान राबविले जात आहे. शहरातील अनेक झाडांना खिळेमुक्त करण्यात आले आहे. मात्र, अनेक वेळा आवाहन केल्यानंतरही व्यापारी जाहिराती लावण्यासाठी झाडांना खिळे मारत आहेत. झाडेही सजीव असून, झाडांनाही वेदना होतात. परिणामी, झाडांना खिळे मारू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. महापौर आणि उपमहापौर यांनी या उपक्रमात सहभागी होत झाडांना खिळे मारू नका, असे आवाहन केले आहे. उपक्रमाच्या माध्यमातून औसा रोडवरील जवळपास सर्वच झाडे खिळेमुक्त आणि वेदनामुक्त करण्यात आली आहेत. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा, सचिव रामेश्वर बावळे, कार्याध्यक्ष अमोल स्वामी, संघटक प्रशांत स्वामी, प्रवक्ते हुसेन शेख, सदस्य शिवाजी निरमनाळे, कृष्णा काळे, राहुल माशाळकर, गणेश स्वामी, गणेश पाटील आदींनी सहभाग नोंदवला.
झाडांना देऊ नका त्रास...
झाडांना देऊ नका, कारण झाडच देतात जगण्यासाठी मोकळा श्वास... असा संदेश देणारे फलक वसुंधरा प्रतिष्ठानने दोरीच्या साहाय्याने झाडांवर लटकविले आहेत. झाडही सजीव आहेत, त्यांनाही खिळे मारल्याने वेदना होतात. झाडांच्या या वेदना सर्वांनी ओळखून झाडांना खिळे मारू नये, असे आवाहन या फलकाच्या माध्यमातून करण्यात आले.