नागरसोगा, गाढवेवाडी, तळणी मार्गे किल्लारी या मार्गावर खड्डे पडले आहेत. त्यातच रस्त्याच्या बाजूने झाडे- झुडपे वाढली आहेत. परिणामी, वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. तसेच रस्ता धोकादायक झाला आहे. पोमादेवी जवळगा, हारेगाव, लिंबाळा या रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडल्याने अपघात होत आहेत.
नागरसोगा गावामधील दत्त मंदिर ते गणेश मंदिरपर्यंतच्या रस्त्याच्या बाजूस झाडे- झुडपे वाढल्याने रस्ता अरुंद झाला होता. झाडांच्या फांद्यांचा विद्युत तारांना स्पर्श होत असल्याने सतत वीजपुरवठा खंडित होत होता. तसेच विजेचा धक्का बसण्याची भीतीही निर्माण झाली होती. त्यामुळे नागरसोगा ग्रामपंचायतीने अतिक्रमणे हटवित झाडांच्या फांद्या तोडल्या आहेत. यावेळी सरपंच सरोज भास्कर सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य भास्कर सूर्यवंशी, लाईनमन म्हेत्रे यांची उपस्थिती होती.
या परिसरातील रस्त्यांची संबंधित विभागाने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.