गेल्यावर्षीपासून कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. त्यामुळे लॉकडाऊन करण्यात येत आहे. गेल्यावर्षी पाच महिने आणि यंदा दीड - दोन महिन्यांपासून व्यापार बंद असल्यामुळे व्यापारी अडचणीत सापडले आहेत. राज्य शासनाने ब्रेक द चेनअंतर्गत कडक निर्बंध लागू केले. त्यानंतर लॉकडाऊन केले. त्यामुळे बाजारपेठेतील व्यवहार ठप्प झाले. मात्र, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली दररोज शहरात गर्दी दिसून येत आहे. फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. गत महिन्यातील २२ एप्रिल रोजी एकाच दिवशी १८ जण कोरोनामुळे दगावले.
गेल्या दीड वर्षापासून व्यापारी दुकाने बंद ठेवत असल्यामुळे व्यापारी अडचणीत सापडले आहेत. बँकेचे व्याज, आयटी रिटर्न, जीएसटी भरणा, सी.सी.चे व्याज, कामगारांचे वेतन, दुकानाचे भाडे, वीजबिल, कुटुंबाचा खर्च हे कसे भागवायचे, असा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर आहे. व्यापाऱ्यांना शासनाने मदत दिली नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.
नियम लागू करून व्यवहार सुरू करावेत...
१ जूनपासून व्यवहार सुरू होईल, अशी अपेक्षा शासनाकडे व्यापारी करीत असून व्यवहारासाठी नियमावली लागू करून सर्व व्यापार सुरू करावेत, अशी मागणी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती यांनी केली. सर्व व्यापारी अडचणीत आहेत. १ जूनपासून सर्व व्यापार ठराविक वेळेत सुरू करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी येथील व्यापारी अनिल अग्रवाल यांनी केली.