चाकूर : येथील बसस्थानकात विविध समस्या निर्माण झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. गेल्या १५ वर्षांपासून बसस्थानकातील स्वच्छतागृह बंद आहे. या गंभीर समस्येकडे एस.टी. महामंडळाचे दुर्लक्ष आहे. नगर पंचायतीने जोरदार स्वच्छता मोहिमेची सुरुवात करून बसस्थानकाच्या आवारात स्वच्छतागृह उभारली होती. प्रारंभी पथकाने पाहणी केली. मात्र, त्यानंतर स्वच्छतेच्या मोहिमेकडे पाठ फिरविली गेल्याचे चित्र आहे. स्वच्छतागृह बंद असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
संपूर्ण देशभरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असताना या स्वच्छता मोहिमेत चाकूर नगर पंचायत सहभागी झाली होती. मोहिमेंतर्गत नगर पंचायतीने मोठा गाजावाजा करून जनजागृती केली होती. शहरातील बसस्थानकात ४, यशवंतराव प्राथमिक शाळेजवळ ४, लक्ष्मीनगरात ४, सिद्धार्थनगरात ७, चाकूर रेल्वे स्थानकाजवळ २ अशी सार्वजनिक शौचालयांची निर्मिती करण्यात आली होती. बसस्थानकातील शौचालयाजवळ पाणी, वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला होता. दरम्यान शहरातील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी पथके आली असता नगर पंचायतचे कर्मचारी उघड्यावर कोणीही शौचास जाऊ नये म्हणून खडा पहारा देत होते. मात्र, पथक परतले, की पुन्हा पूर्वीची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, दुसऱ्यांदा विभागीय पातळीवरील पथक चाकुरात दाखल होत असताना नगर पंचायतीने लगबगीने स्वच्छता मोहीम राबविली. हेही पथक परतल्यानंतर या शौचालयाकडे कोणी फिरकूनही पाहिले नाही. शौचालयांची व परिसराची साफसफाई केली जात नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्याचबरोबर काही ठिकाणच्या शौचालयांच्या दरवाजांची मोडतोड झाली आहे. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. बसस्थानकात घाणीच्या साम्राज्याने जनावरांचा खुलेआम वावर वाढला आहे. तर बसस्थानकाच्या शेजारी असलेले काही दुकानदार त्यांचा कचरा बसस्थानकाच्या आवारात आणून टाकतात. नगर पंचायतीने स्वच्छता मोहिमेंतर्गत उभारलेली सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. त्याचा परिणाम प्रवास करणाऱ्या पुरुष, महिला प्रवाशांना सहन करावा लागत आहे. बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांना चक्क बसस्थानकातील आवारात उघड्यावरच प्रातर्विधी उरकण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. या भागातील काही लोक प्रातर्विधी, लघुशंका करण्यासाठी बसस्थानकाच्या खुल्या आवाराचा आधार घेतात. त्यामुळे स्वच्छतागृहाचा प्रश्न त्वरित सोडवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात...
ग्रामीण भागातील नागरिक एसटी बसनेच प्रवास करतात. लांबचा प्रवास करून आल्यास या ठिकणी स्वच्छतागृहाची सोय नाही. परिणामी, नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
- नागनाथ पाटील, चाकूर
बीओटी तत्त्वावर बांधकामाचा प्रयत्न
चाकूर येथील बसस्थानकातील स्वच्छतागृह खराब झाले आहे. सध्या ते बंद आहे. त्यामुळे प्रवासी वर्गाची कुचंबणा होत आहे. याची आम्हाला जाणीव आहे. तेथे नगर पंचायतीने स्वच्छतागृह बांधून द्यावे. यासाठी पाठपुरावा करत आहोत. अन्यथा बीओटी तत्त्वावर बांधण्याचा प्रयत्नही सुरू आहे.
-सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, लातूर
जागा दिल्यास प्रश्न मार्गी
चाकूर येथील बसस्थानकात एसटी महामंडळाने आम्हाला जागा दिली, तर नगर पंचायत स्वच्छतागृह बांधून ते चालवू शकते; परंतु बांधकाम करून लगेच हस्तांतर करू शकत नाही.
- अजिंक्य रणदिवे, मुख्याधिकारी, नगर पंचायत, चाकूर