शिरूर अनंतपाळ तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींची निवडणूक रंगली असून, ४९५ उमेदवारांनी नामांकनपत्र दाखल केले होते. त्यापैकी ११८ उमेदवारांनी माघार घेतली, तर २७ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे ४४९ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. त्यांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात सील होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून ८६ मतदान केंद्रांवर ८६ केंद्राध्यक्ष, ८६ सुरक्षा रक्षक, तर प्रत्येकी ३ कर्मचारी असे एकूण ४५५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
पाच झोनसाठी २५ कर्मचारी राखीव...
तालुक्यातील २७ गावांतील ग्रामपंचायत निवडणूक बुथपर्यंत तत्काळ पोहोचता यावे म्हणून पाच झोन तयार करण्यात आले असून, पाच क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर मतदान केंद्रांवर २५ कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. सायंकाळी मतदान संपल्यानंतर ८६ मतदान केंद्रांवरील निवडणुकीचे मतदान यंत्र, गोषवारा, विविध प्रकारची पाकीटे आदी साहित्य जमा करण्यासाठी तहसील कार्यालयात नऊ टेबल सज्ज ठेवण्यात आले आहेत.