लातूर : जिल्ह्यात सातत्याने वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. रेणापूर परिसरात जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने रेणापृूर, जवळगा, खरोळा हे तीन बॅरेजेस भरले आहेत. त्यामुळे या बॅरेजेसमधून १४४१ क्युसेक पाणी सोडून देण्यात आले आहे. दरम्यान, रेणा नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आठवडाभरापासून वातावरणात बदल झाला आहे. दररोज वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे शेती मशागतीच्या कामात व्यत्यय येत आहे. मंगळवारी रात्री रेणापूर तालुक्यात मुसळधार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे रेणापूर, जवळगा आणि खरोळा हे तीन बॅरेजेस तुडुंब भरले. त्यामुळे प्रशासनाने तिन्ही बॅरेजेसचे दरवाजे दोन मीटरने उघडून रेणा नदीत पाणी सोडून दिले आहे.लातूर शहराबरोबरच जिल्ह्यातील औराद शहाजानी, उस्तुरी, येरोळ या भागांत पाऊस झाला. जोरदार वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला. तसेच साकोळ येथील काही कुटुंबांच्या घरावरील पत्रेही उडून गेले आहेत. पावसामुळे आंब्याचेही नुकसान झाले आहे.
नदीकाठावरील नागरिकांना इशारा...रेणापूर तालुक्यातील तीन बॅरेजेसमधील पाणी सोडून देण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी दक्ष राहावे. - श्रीनाथ कुलकर्णी, शाखा अभियंता
फाेटाेओळ : रेणापूर तालुक्यातील रेणापूर, जवळगा, खरोळा बॅरेजेस भरल्याने बुधवारी सकाळी रेणा नदीपात्रात पाणी सोडून देण्यात आले.