अहमदपूर : पेट्रोल, डिझेल पंपावर पाणी, स्वच्छतागृह, वाहनात हवा भरणे आदी सुविधा उपलब्ध असणे बंधनकारक आहे. परंतु, शहरासह तालुक्यातील पेट्रोल पंपावर या सुविधा नावालाच असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे वाहनधारकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
शहरासह तालुक्यात चार कंपन्यांचे पेट्रोलपंप आहेत. तेल कंपन्यांच्या नियमाप्रमाणे पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वाहनात हवा भरणे, आपत्कालिन स्थितीत टेलिफोन व प्रथमोपचार पेटी अशा सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. परंतु, तालुक्यातील बहुतांश पेट्रोलपंप चालकांकडून या नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. नाममात्र, काही पेट्रोल पंपावर यातील काही सुविधा पुरविल्या जातात. त्यामुळे ग्राहकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
एवढेच नव्हे तर नव्याने सुरू झालेल्या काही पेट्रोल पंपाच्या सावलीसाठी शेडही नाही. त्यामुळे उन्हात अथवा पावसात थांबून वाहनात पेट्रोल भरावे लागत आहे. ग्राहकांबरोबर तेथील कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. पेट्रोल पंपावर प्रथमोपचार पेटी आवश्यक आहे. परंतु, काही पेट्रोल पंपावर ती दिसून येत नाही.
सुविधा नसल्याने नाराजी...
तालुक्यातील पेट्रोल पंपांवर आलेल्या वाहनधारकांना मोफत हवा, पिण्यास शुध्द पाणी मिळणे आवश्यक आहे. परंतु, याही सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. याकडे पेट्रोल पंपचालकांसह अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागत असल्याचे पहावयास मिळत आहे. ग्राहकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
तक्रार पुस्तक नाही...
पेट्रोलपंपावर इंधन पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या
अधिकाऱ्यांचा क्रमांक असणे आवश्यक असते. ग्राहकांची काही तक्रार असल्यास थेट कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन करून तक्रार करता येते. त्याचबरोबर तक्रार पुस्तिकाही असणे गरजेचे असते. परंतु, तीही उपलब्ध नसल्याचे पहावयास मिळत आहे.