धुऱ्यावरून टेंभुर्णी शिवारात दोघांना मारहाण, गुन्हा दाखल
लातूर : शेतातील बांधावरून तसेच जनावरे घेऊन जाण्याच्या कारणावरून दोघांना मारहाण झाल्याची घटना अहमदपूर तालुक्यातील टेंभुर्णी शिवारात घडली. याबाबत अहमदपूर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
टेंभुर्णी येथील फिर्यादी सोमन संग्राम यरमे व त्यांच्या आईला बांधावरून शेतातून जनावरे घेऊन जाण्याच्या कारणावरून माधव बापुराव वनामे व अन्य तिघांनी लाथाबुक्क्यांनी तसेच काठीने मारून जखमी केले. फिर्यादीच्या उजव्या हातावर या मारहाणीत गंभीर जखम झाली आहे. तसेच फिर्यादीच्या आईलाही काठीने मारून जखमी केले आहे, असे सोमन यरमे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून माधव बापूराव वनामे व अन्य तिघांविरुद्ध अहमदपूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ भिसे करीत आहेत.
मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण
लातूर : देवणी तालुक्यातील अंबेगाव येथे मागील भांडणाची कुरापत काढून फिर्यादी सोमनाथ धानेप्पा मठपती यांना मारहाण झाली. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, असे मठपती यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार विष्णू धोंडीराम चौधरी व अन्य दोघांविरुद्ध देवणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ कांबळे करीत आहेत.
कारची दुचाकीला धडक, किनगाव पोलिसात गुन्हा दाखल
लातूर : भरधाव वेगातील कार चालकाने मानखेड पाटी येथे समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. याबाबत नामदेव एकनाथ बिल्लापट्टे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमएच १४ सीएक्स ६७१५, या क्रमांकाच्या कार चालकाविरुद्ध किनगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मुरकुटे करीत आहेत.