औसा (जि. लातूर) : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन नायगाव (जि. नांदेड)कडे परतणारे वारकरी भोजनासाठी रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील उजनीजवळ थांबले होते. भोजनानंतर निघाले असता पाठीमागे एक जण विसरला होता. त्यास आणण्यासाठी पुन्हा टेम्पो वळविताना चालकाचा ताबा सुटल्याने वाहन उलटले. त्यात दहा वारकरी जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील वारकरी दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्ताने टेम्पो करून पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यानंतर रविवारी मुक्काम करून ते सोमवारी सकाळी गावाकडे निघाले होते. रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील उजनीजवळ पोहोचल्यानंतर भोजनासाठी ते एका हॉटेलवर थांबले. भोजन केल्यानंतर परतीच्या पुढील प्रवासाला निघाले असता टेेम्पो (एमएच २६ - सी ८८५१)तील एक वारकरी तिथेच राहिले होते. ते काही जणांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चालकास सांगितले. तेव्हा चालकाने त्या वारकऱ्यास आणण्यासाठी टेम्पो वळवित असताना अचानक ताबा सुटल्याने टेम्पो उलटला. त्यात चालक राजू नागठाणे, माधव कल्याणी, साहेब माने, सचिन माने, विठ्ठल माने, पंढरी माने (रा. नायगाव, जि. नांदेड) यांच्यासह अन्य चौघे असे एकूण ९ जण जखमी झाले. जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेतून औसा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
तिघांना लातूरला हलविलेअपघातात विठ्ठल माने, राजीव नागठाणे, सचिन माने हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना लातूरला हलविण्यात आले. किरकोळ जखमींना प्रथमोपचार करून घरी पाठविण्यात आले. घटनास्थळी भादा पोलिस ठाण्याचे ए. के. कांबळे, रतन मोरे, आनंद शिंदे, फेरोज शेख यांनी भेट देऊन भाविकांना उपचारासाठी दाखल करण्यास मदत केली.
टेम्पोत १६ वारकरीअपघातग्रस्त टेम्पोमध्ये एकूण १६ वारकरी होते. त्यातील १० जण जखमी झाले असले तरी तिघांना अधिक मार लागला आहे.
वारकऱ्यांना तत्काळ बाहेर काढलेअपघात झाल्याचे पाहताच माझ्यासह हॉटेलमधील कामगार रज्जाक शेख, अमिर शेख यांनी धाव घेतली. जखमी वारकऱ्यांना तत्काळ टेम्पोतून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. सुदैवाने वाहनाचा वेग कमी होता.- चाँद शेख, हॉटेल चालक
महिनाभरात सहा अपघातरत्नागिरी-नागपूर महामार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. महिनाभरात सहा अपघात घडले असून, त्यात सहा जण जागीच ठार झाले तर ४२ जण जखमी झाले आहेत.