लातूर : कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, शासकीय व खासगी स्तरावर एकूण १० हजार बेड उपलब्ध केले आहेत. बालकांना व इतर रुग्णांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा, औषधांचा पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. बालकांसाठी किमान २०० ऑक्सिजन बेडचे उद्दिष्ट आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडच्या अनुषंगाने गठित करण्यात आलेल्या टास्क फोर्सची बैठक बुधवारी झाली. या बैठकीत तयारीचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख, जिल्हा आराेग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश हरीदास, स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राहुल वाघमारे, बालरोगतज्ञ्ज डॉ. शिवप्रसाद मुंदडा, डॉ. संदिपान साबदे, डॉ. महिंद्रकर, आयएमएच्या अध्यक्ष डॉ. सुरेखा काळे यांच्यासह टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने शासकीय स्तरावर ऑक्सिजन साठवण क्षमतेत वाढ करण्यात आली आहे. खासगी रुग्णालयांनीही क्षमतेत वाढ करावी. जम्बो व ड्युरा सिलिंडरची संख्या वाढवावी. ‘आयएमए’ने यात लक्ष घालून ऑक्सिजन क्षमता वाढविण्याबाबत मार्गदर्शन करावे. जेणेकरुन संभाव्य तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यास ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील. बालकांसाठी २०० ऑक्सिजन बेड ठेवण्यासाठीचे उद्दिष्ट आहे. आरोग्य विभागाने शासकीय व खासगी असे ५४० ऑक्सिजन बेड निर्माण करण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात १० याप्रमाणे १००, उपजिल्हा रुग्णालय १५, स्त्री रुग्णालय २०, सामान्य रुग्णालय, उदगीर २५, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ५०, एमआयटी ८०, खासगी बाल रुग्णालयात २५० बेड या पद्धतीचे नियोजन आहे. तर जिल्ह्यात एकूण १०५ आयसीयू बेड उपलब्ध करण्यात येतील, अशी माहिती डॉ. सतीश हरीदास यांनी दिली.
जिल्ह्यात बालकांसाठी २०० ऑक्सिजन बेडचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:15 IST