लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : प्राचीन खेळ असलेला मल्लखांब शरिराची लवचिकता वाढविण्यासाठी तसेच पिळदार शरीरयष्टीसाठी परिचित आहे. कमी वेळात अधिकाधिक व्यायाम मल्लखांबमुळे होतो. त्यामुळे या खेळाला महत्त्व आहे. जिल्ह्यातही मल्लखांब खेळाची सेंटर वाढत असल्याने हा खेळ अधिक बळकट होत आहे.
पूर्वी तालीम तेथे मल्लखांब असायचा. लाकडी मल्लखांब व रोप मल्लखांब अशा दोन प्रकारात हा खेळ खेळला जातो. मात्र, या खेळाला स्वतंत्र दर्जा मिळाल्याने याची व्याप्ती वाढली. त्यामुळे हा खेळ लोकप्रिय होऊ लागला. लातूर शहरातही अनेक वर्षांपूर्वी आर्य समाज मंदिर, संतोष जोगी व्यायामशाळा व जनकल्याण विद्यालयात हा खेळ नित्यनेमाने चाले. गतवर्षी या खेळाला नोकरी आरक्षणात संधी मिळाली. तसेच यंदाच्या वर्षात खेलो इंडिया स्पर्धेतही या खेळाचा समावेश झाल्याने या खेळाप्रति खेळाडूंचे आकर्षण वाढले आहे. लातूर शहरातही मल्लखांबची जवळपास दहा सेंटर चालतात. तालुका व ग्रामीण भागात जवळपास २५ ठिकाणी मल्लखांब खेळला जातो. त्यामुळे या खेळाची क्रेझ जिल्ह्यात वाढत आहे. जिल्ह्याने दोन-तीनवेळा राज्य स्पर्धेचे यजमानपद भूषविले असून, अनेक राष्ट्रीय व विद्यापीठ खेळाडू लातूरने दिले आहेत. राज्य संघाच्या टेक्निकल कमिटीच्या अध्यक्षपदी लातूरचे मोहन झुंजे असून, राज्य कार्यकारिणीवर कार्य उपाध्यक्ष म्हणून ॲड. महादेव झुंजे हेही कार्यरत आहेत. दापोली येथे झालेल्या क्रीडा महोत्सवात नांदेड विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत लातूरच्या तीन खेळाडूंनी आपल्या संघाला कांस्यपदक मिळवून दिले आहे. एकंदरित मराठमोळ्या मल्लखांबची पाळेमुळे जिल्ह्यात घट्ट रोवली जात असल्याचे चित्र आहे.
मल्लखांब सेंटरसाठी लातूरचा प्रस्ताव
केंद्र शासनाच्यावतीने एक हजार मल्लखांब सेंटर देशभरात होणार असून, पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात दहा सेंटर देण्यात आली आहेत. लातूरसाठीही प्रस्ताव गेला असल्याचे जिल्हा संघटनेमार्फत सांगण्यात आले.
गाव तेथे मल्लखांब गरजेचा...
जिल्ह्यात मल्लखांबचे सेंटर वाढत असले तरी प्रत्येक गावात मल्लखांब सेंटर होणे गरजेचे आहे. विविध जिल्हा परिषद शाळा, महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळेत मल्लखांब चालावा. चार मॅट व मल्लखांबचा एक पोल याचा अंदाजित खर्च ४० हजार रुपये आहे. एकदा गुंतवणूक केली की अनेक वर्ष हा खेळ व्यायामासह खेळाडू घडविण्यास मदत करतो. मध्य प्रदेशने मल्लखांब खेळाला राज्य खेळ म्हणून घोषित केले आहे. याचप्रमाणे महाराष्ट्रातही या खेळाच्या वाढीसाठी प्रयत्न व्हावा, असे राष्ट्रीय खेळाडू मोहन झुंजे-पाटील यांनी सांगितले.
संकुलातही हवे स्वतंत्र मैदान...
क्रीडा संकुलात वॉकिंग ट्रॅकच्या बाजूला मल्लखांब असून, त्याठिकाणी जागा अपुरी पडत आहे. महिलाही याठिकाणी सरावाला येत असल्याने अडचण होत आहे. त्यामुळे संकुलात स्वतंत्र असे आऊटडोअर मल्लखांब मैदान गरजेचे असल्याचे मत प्रशिक्षक आशा झुंजे यांनी सांगितले.