लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आ. संभाजी पाटील-निलंगेकर यांनी शासन व प्रशासनाला धारेवर धरले.
सक्तीच्या वीज बिल वसुलीबाबत आ. संभाजी पाटील-निलंगेकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांसह ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. वाढीव वीज बिलांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात यावी, अशी सूचना करून जोपर्यंत या समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत होणारी सक्तीची वसुली थांबविण्यात यावी, अशी मागणी केली. या मागणीला मान्य करत पालकमंत्री अमित देशमुख यांनी याबाबत चौकशी समिती नेमण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देऊन जोपर्यंत समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत सक्तीची वसुली करण्यात येऊ नये, असे निर्देश दिले. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अतिवृष्टीमुळे वाहून गेलेले रस्ते, पुले तसेच जिल्ह्यातील विविध गावांमध्ये असलेल्या स्मशानभूमीच्या शेडसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आ. पाटील यांनी केली.
शिक्षण, आरोग्यासाठी निधी द्यावा...
काम सुरू असलेल्या आरोग्य केंद्रांना निधी उपलब्ध करून देत ती तत्काळ रुग्णांच्या सेवेसाठी खुली करावीत. कोरोनाकाळात जिल्हा परिषद शाळेत डिजीटल शिक्षण उपक्रम राबविण्यात आला, जिथे चांगले काम झाले तिथे प्रोत्साहन म्हणून विशेष निधी उपलब्ध करून द्यावा. निलंगा तालुक्यातील हाडगा येथील शहीद जवान नवनाथ लोभे यांचा तत्काळ सन्मान करण्यात यावा, अशी मागणीही माजी मंत्री आ. पाटील यांनी केली.