लातूर - जिल्ह्यातील लातूर ते नांदेड महामार्गावर असलेल्या भातांगळी पाटी परिसरात नांदेड - लातूर बसवर दगडफेक केल्याची घटना शुक्रवारी घडली. याबाबत लातूर ग्रामीण पाेलीस ठाण्यात अज्ञात चाैघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेविषयी पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी बसचालक संभाजी विश्वनाथ सूर्यवंशी (३०, रा. सांगवी बु., ता. जि. नांदेड) हे आपल्या ताब्यातील नांदेड - लातूर बस (एमएच ०६ बीडब्ल्यू ४३९८) घेऊन लातूरला आले हाेते. दरम्यान, ते परत नांदेडला जात असताना भातांगळी पाटी परिसरात एका रसवंती गृहाजवळ काही लाेकांमध्ये वाद सुरु हाेता. यावेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या या बसवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत बसच्या खिडकीची काच फुटल्यामुळे पाच हजारांचे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी घडली. याबाबत लातूर ग्रामीण पाेलीस ठाण्यात बसचालक सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चाैघा अज्ञातांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बसवर दगडफेक का करण्यात आली, याचा शाेध पाेलीस घेत आहेत. ही बस अडवून लुटण्याचा प्रयत्न केला जात हाेता का, याचाही शाेध पाेलिसांकडून घेतला जात आहे. लातूर जिल्ह्यात अलिकडे वाहनांना अडवून लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
वादातून घडली घटना...
लातूर ते नांदेड महामार्गावरील भातांगळी पाटी परिसरात असलेल्या एका रसवंती गृहाजवळ स्थानिकांमध्ये वाद सुरु हाेता. दरम्यान, यावेळी माेठी गर्दी जमली हाेती. यावेळी लातूर येथून नांदेडच्या दिशेने जाणारी बस दाखल झाली. रस्त्यालगत वाद, भांडण सुरु असल्याने बसचा वेग थाेडासा कमी झाला. यावेळी काेणीतरी बसच्या उजव्या बाजूच्या खिडकीवर दगडफेक केली. यात बसचे नुकसान झाले आहे, असे लातूर ग्रामीण पाेलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश कदम यांनी सांगितले.