लातूर: यंदा सोयाबीनला चांगला भाव आला असून मंगळवारी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात प्रति क्विंटल ६ हजार ९९० रुपयाचा उच्चांकी दर मिळाला आहे. यंदाच्या हंगामात हा सर्वाधिक दर आहे. मात्र बाजारातील सोयाबीनची आवक घटली आहे. सद्यस्थितीत ७ हजार ३०७ क्विंटल आवक आहे.
सोयाबीनच्या काढणीनंतर मार्केट यार्ड येथे ४० ते ५० हजार क्विंटल दिवसाला आवक होती. आता पाच हजारावर आवक आली आहे. मात्र भाव चांगला येत आहे. सुरुवातीच्या काळात चार हजार ते साडेचार हजार प्रति क्विंटल दर होता. त्यानंतर पाच ते साडेपाच हजार प्रति क्विंटल दर मिळाला. मंगळवारी उच्चांकी दर निघाला असून प्रति क्विंटल सहा हजार ९९० रुपये दर निघाला. यंदा सुरुवातीपासूनच चांगला भाव सोयाबीनला आल्याने हमीभाव केंद्रावर शेतकरी फिरकले नाहीत. तूर व हरभरा यालाही हमीभाव केंद्रा पेक्षा अधिकचा दर मिळत आहे.
सध्या बाजारात हरभऱ्याची सर्वाधिक आवक आहे. १५ हजार ३४८ मंगळवारी आवक होती. ३ हजार ८०५ क्विंटल तुरीची आवक होती. मूग ९४, एरंडी २५, करडी ४११, चिंच २६६५, चिंचुका १३४२, गहू १०८०, ज्वारी ४७४, मका १२ क्विंटल आवक होती. या सर्व शेतमालाला मंगळवारी चांगला दर मिळाला. लॉकडाऊनमुळे मागील दोन दिवस बाजार बंद होता. परंतु गुढीपाडव्याचे औचित्य साधून मार्केट यार्डातील बाजार सुरक्षित अंतर पाळून मंगळवारी चालू ठेवला होता. यामुळे शेतकऱ्यांना गुढीपाडव्याची शेती साहित्याची खरेदी करता आली. सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे बाजारपेठेत कडक निर्बंध आहेत. कृषी आणि जीवनावश्यक साहित्याचे दुकाने वगळता अन्य दुकाने बंद आहेत. कोरोनाच्या सावटाखाली गुढीपाडवा साजरा करावा लागला.