प्रारंभी सोयाबीनचे भाव ४ हजारावर होते. सोंगणीपासून काढणीपर्यंतचे पैसे देणे लागत असल्यामुळे अनेक शेतकरी खळ्यावरूनच सोयाबीनची विक्री करतात. आता सोयाबीनला ७ हजारांपेक्षा अधिक दर आहे. शेतकऱ्यांकडून कमी भावाने सोयाबीन खरेदी करणाऱ्या बियाणे कंपन्या अव्वाच्या सव्या भावाने बियाणे विक्री करत असल्याने सोयाबीनची भाववाढ शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. रासायनिक खतांच्या किमती कमी झाल्या असल्या तरी आता खासगी कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांसाठी गत वर्षीच्या तुलनेत प्रति बॅग जवळपास १२०० रुपये जास्त मोजावे लागत आहेत. घरी पेरणीसाठी सोयाबीन नाही आणि कमी किमतीत मिळणारे महाबीजचे बियाणे अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांना खासगी कंपनीच्या बियाणे खरेदी शिवाय या वर्षी पर्याय नसल्याचे चित्र आहे.
शासनाच्या दराप्रमाणेच विक्री करावी..
शासनाने निर्देशित केलेल्या दराप्रमाणेच बियाणे व खतांची विक्री करावी. तालुक्यात भरारी पथक नियुक्त केले आहे. कृषी विभागाने तालुक्याच्या ठिकाणी रासायनिक खत व बियाणांचे भावफलक लावले आहेत. रासायनिक खत, बियाणे एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री करत असेल तर केंद्र चालकांवर कारवाई करण्यात येईल. - भुजंग पवार, प्रभारी तालुका कृषी अधिकारी.