जळकोट : आठवडाभरापासून पाऊस नसल्याने जळकोट तालुक्यातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. जवळपास ५० टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असून उर्वरित ५० टक्के शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यात आतापर्यंत १३९ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. बळिराजाचे डोळे वरुणराजाकडे लागले आहेत.
जळकोट तालुक्यात पेरणीयोग्य क्षेत्र २५ हजार हेक्टर आहे. नगदी पीक म्हणून सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा असतो. त्यापाठोपाठ कापसाची लागवड केली जाते. तालुक्यात १० जून रोजी १५ मि.मी. पाऊस झाला होता. ११ जून रोजी ४० मि.मी. पाऊस झाला. १४ रोजी २९ मि.मी., तर १६ जून रोजी ४९ मि.मी. पाऊस झाला.
जळकोट महसूल मंडळात १९२ मि.मी., घोणसी मंडळात ९६ मि.मी. अशी पावसाची नोंद आहे. या पावसावर काही शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्यांना सुरुवात केली. यंदा वेळेवर पाऊस झाल्याने वेळेवर पेरण्या होत असल्याने समाधान व्यक्त होत होते. दरम्यान, १६ जूनपासून पावसाने डोळे वटारल्याने तालुक्यातील ५० टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.
पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तालुक्यात सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा होतो. त्यापाठोपाठ कापूस, ज्वारी, मूग, उडीद, तीळ ही पिके घेतली जातात. गेल्या आठवडाभरापासून पाऊस नसल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
उगवलेल्या पिकांना पाण्याची गरज...
मृगाच्या प्रारंभी झालेल्या पावसावर ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. त्यांचे चांगले पीक उगवले आहे. सध्या पाण्याची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, ते शेतकरी विहीर, बोअरच्या आधारे पाणी देत आहेत. मात्र, ज्यांच्याकडे सिंचनाची सोय नाही, असे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत असल्याचे दिसून येत आहे.
१० हजार हेक्टरवर सोयाबीन...
तालुक्यात आतापर्यंत जवळपास १० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. त्यापाठोपाठ तूर, उडिदाचा अल्प प्रमाणात पेरा झाला आहे. गेल्या आठवड्यापासून पाऊस झाल्याने जवळपास ५० टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या नाहीत. आगामी काळात पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आकाश पवार यांनी केले आहे.
दुबार पेरणीचे संकट...
तालुक्यातील शेतकऱ्यांनी महाग मोलाचे बी- बियाणे खरेदी करून पेरणी केली आहे. पेरणीवेळी खताचा वापर केला. परंतु, पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना चिंता लागली आहे. दुबार पेरणी करावी लागणार की काय अशी भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.