जमिनीच्या मोजणीवरून एकास मारहाण
लातूर : जानवळ शिवारात शेतजमीन मोजणीच्या कारणावरून लाथा-बुक्क्याने, काठीने मारहाण झाल्याची घटना घडली. याबाबत शिवाजी मलबा बानापुरे (७०, रा. जानवळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुधाकर रामचंद्र बानापुरे यांच्यासह अन्य एकाविरुद्ध चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. थोरमोटे करीत आहेत.
घरासमोर बांधलेली म्हैस चोरीला
लातूर : काळ्या रंगाची मुरा जातीची म्हैस अयोध्या नगर येथून चोरीला गेल्याची घटना घडली. घरासमोर म्हैस बांधली होती. दरम्यान, रात्री चोरट्यांनी म्हैस चोरली असे नेताजी भीमराव सूर्यवंशी (रा. अयोध्या नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जुगारावर छापा; साहित्यासह रोकड जप्त
लातूर : लोकांकडून पैसे घेऊन स्वत:च्या फायद्यासाठी मटका जुगार खेळत व खेळवीत असताना निदर्शनास आल्याने जिल्ह्यात दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली. याबाबत मुरुड व रेणापूर पोलिसात प्रत्येकी एक गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोरगाव चौकात लोकांकडून पैसे घेऊन मटक्याच्या आकड्यावर लावून मिलन डे नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना विश्वनाथ शिवराम परदेशी हा आढळून आला. याबाबत पोकॉ. रवींद्र मारोती पेद्देवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरुड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. मुंडे करीत आहेत.
तर दुसरी घटना खरोळा बाजार येथे घडली. लोकांकडून पैसे घेऊन मटक्यावर लावताना विलास राजकुमार चाफेकानडे (रा. खरोळा) तसेच परमेश्वर जयसिंग चव्हाण (रा. रेणापूर) हे दोघे मिळून आले. याबाबत पोहेकॉ. किरण गंभिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रेणापूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सीताफळाचे झाड तोडून मारहाण
लातूर : निलंगा तालुक्यातील धानोरा येथे घरासमोरील सीताफळाचे झाड तोडले. याबाबतची विचारणा केली असता फिर्यादीस मारहाण झाल्याची घटना घडली. आरोपीने शिवीगाळ करून तुला खलास करून टाकतो अशी धमकी दिली, असे धोंडीराम नामदेव जाधव (रा. धानोरा, ता. निलंगा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार बाबू नन्हूसाब मुल्ला, नजमोद्दीन बाबू मुल्ला या दोघांविरुद्ध निलंगा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, बाबू नन्हूसाब मुल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धोंडीराम नामदेव जाधव यांच्याविरुद्धही निलंगा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि. अक्कमवाड करीत आहेत.