येरोळ : खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी बी- बियाणे, खते खरेदी करू लागले आहेत. दरम्यान, कृषी सेवा केंद्रातून महाबीजचे सोयाबीन मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांतून करण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची धावाधाव सुरू झाली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात वेळेवर आणि पुरेसा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने शिरुर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ परिसरातील शेतकऱ्यांनी आनंदित होऊन खरीप हंगामपूर्व कामे आटोपली आहेत. सध्या शेतकरी बी- बियाणे, खतांची जुळवाजुळव करीत आहेत. त्यामुळे कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची रेलचेल वाढली आहे. दरम्यान, यंदा सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याने खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मध्य प्रदेशातील बहुतांश बियाणे कंपन्यांनी राज्यातील विविध भागातून सोयाबीन खरेदी केले. पावसामुळे महाबीजचा बीजोत्पादन कार्यक्रमही यंदा प्रभावित झाला होता. त्यामुळे महाबीजकडून गत हंगामाएवढे बियाणे उपलब्ध होणार नसल्याची चर्चा आहे.
खरीप हंगाम सुरू होण्यास आठवडाभराचा कालावधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत बाजारात महाबीजचे सोयाबीन बियाणे संपल्याचे सांगितले जात आहे. काही कृषी सेवा केंद्रात महाबीजचे सोयाबीन असतानाही ते उपलब्ध नसल्याचे शेतकऱ्यांना सांगितले जात आहेत. महागडे बियाणे शेतकऱ्यांना विक्री करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
खासगी कंपन्यांचे बियाणे महाग...
महाबीजचे बियाणे गेल्या वर्षीच्या दराने विक्री केले जात आहे. मात्र, खासगी कंपन्यांच्या बियाणांच्या दरात वाढ झाली आहे. काही कंपन्यांचे २५ किलो बियाणे ३२५० ते ३४५० रुपयांना झाले आहे. महाबीजच्या ३० किलो बियाणाचा दर २२५० रुपये आहे. त्यामुळे शेतकरी महाबीजला प्राधान्य देत आहेत. खासगी कंपन्या व महाबीजच्या बियाणांच्या दरात मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांचा कल महाबीजकडे आहे.