चाकुरातील कोविड लसींचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:19 AM2021-04-16T04:19:17+5:302021-04-16T04:19:17+5:30

चाकूर : शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आरोग्य विभागाकडून कोविड लसीकरणावर भर देण्यात येत आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारपासून ...

Shortage of covid vaccines in Chakura | चाकुरातील कोविड लसींचा तुटवडा

चाकुरातील कोविड लसींचा तुटवडा

Next

चाकूर : शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आरोग्य विभागाकडून कोविड लसीकरणावर भर देण्यात येत आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारपासून लसींचा साठा संपुष्टात आल्याने नळेगाव येथील केंद्रावर लसीकरणास ब्रेक लागला आहे. तालुक्यात आतापर्यंत ११ हजार ४३५ व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तो रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहे. दरम्यान, शासनाच्या वतीने आरोग्य विभागाकडून कोविड लसीकरणावर भर दिला जात आहे. ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यातील चापोली, जानवळ, नळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांच्या ठिकाणी लसीकरण मोहीम राबविली जात आहे. लसीकरणाचा वेग वाढावा म्हणून अंगणवाडी कार्यकर्ती, आशा स्वयंसेवकांची पथके तयार करण्यात आली आहे. ४५ वर्षांपुढील व्यक्तींची यादी तयार करण्यात येऊन लसीकरण करून घेत आहे.

तालुक्यातील चापोली प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत २१५८, जानवळ २६९५, नळेगाव येथे २३५२ जणांना लसीकरण करण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालयातून ४२३० जणांना लसीकरण करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत ११ हजार ४३५ जणांना लस देण्यात आली आहे.

दरम्यान, लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना जिल्हा पातळीवरून लसींचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे गुरुवारी दुपारपासून तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रातील लसींचा साठा संपुष्टात आला. केवळ येथील ग्रामीण रुग्णालयात ८० लसी शिल्लक आहेत. चापोलीत १०, जानवळ येथे ४०, नळेगाव येथे लस नाही. त्यामुळे जिल्हास्तरावर लसींची मागणी करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाकडे मागणी...

तालुक्यास उपलब्ध झालेल्या लसींचा वापर झाला आहे. आता लसींचा साठा संपुष्टात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली आहे. लस प्राप्त होताच पुन्हा लसीकरणास सुरुवात करण्यात येईल.

- डॉ. अर्चना पंडगे, तालुका वैद्यकीय अधिकारी.

चार दिवसांपुरताच साठा...

काही ठिकाणी लसीकरणाचे काम चांगले झाले आहे. त्यामुळे तेथील लस संपुष्टात येऊ शकते. सदरील ठिकाणी अन्य नजीकच्या ठिकाणहून लस घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. लसींची मागणी करण्यात आली आहे. सध्या चार दिवस पुरेल एवढा लसींचा साठा आहे.

- डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: Shortage of covid vaccines in Chakura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.