कुस्तीच्या तालमीत पुन्हा घुमू लागला शड्डू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:14 AM2021-06-19T04:14:20+5:302021-06-19T04:14:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : लातूरला कुस्तीची परंपरा आहे. लातूरच्या मातीतून दिग्गज असे कुस्तीपटू निर्माण झाले आहेत. त्यामुळे येथील ...

Shaddu started walking again in wrestling training! | कुस्तीच्या तालमीत पुन्हा घुमू लागला शड्डू !

कुस्तीच्या तालमीत पुन्हा घुमू लागला शड्डू !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : लातूरला कुस्तीची परंपरा आहे. लातूरच्या मातीतून दिग्गज असे कुस्तीपटू निर्माण झाले आहेत. त्यामुळे येथील कुस्तीला आगळेवेगळे महत्त्व आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास सव्वा दोन महिने कुस्ती बंद होती. अनलॉकनंतर पुन्हा कुस्ती सुरू झाल्याने जिल्ह्यातील तालमीत पुन्हा शड्डूचा आवाज घुमत आहे.

जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कुस्तीचे आखाडे आहेत. या आखाड्यात नियमित बच्चे कंपनीसह मोठे मल्ल सकाळ-सायंकाळच्या सत्रांत कुस्तीचे धडे गिरवतात. शहरातील श्री महात्मा बसवेश्वर कुस्ती केंद्र यासह रुई रामेश्वर, रामलिंग मुदगड, उदगीर, आलमला, शिवणी, टाका, शिवली यासह अनेक ठिकाणी कुस्तीचे आखाडे आहेत. काही ठिकाणी मातीच्या आखाड्यासह मॅटचीही व्यवस्था मल्लांसाठी करण्यात आली आहे. पहाटेच्या प्रहरासह खेळाडूंचा व्यायाम या ठिकाणी सुरू होतो. संध्याकाळच्या सत्रातही या ठिकाणी कुस्तीचे धडे गिरविले जातात. गेल्या दोन वर्षांपासून स्पर्धा बंद असल्याने कुस्तीपटूंना आर्थिक झळ बसली. मैदाने बंद असल्याने खेळाडूंना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. याची झळ त्यांच्या खुराकाला बसली. त्यामुळे कुस्तीपटू काहीअंशी नाराज होते. मात्र, पुन्हा अनलॉक झाल्याने खेळाडूंनी सरावाला प्रारंभ केला आहे. गतवर्षीही तीन महिने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आखाडे बंद होते. त्यामुळे सलग दोन वर्षांपासून नियमित सरावाला खेळाडू मुकले होते. आता अनलॉक झाल्याने पुन्हा कुस्तीचे आखाडे गजबजू लागले आहेत.

दोन सत्रांत सराव...

पहाटे ५.३० ते सकाळी ८.३० पर्यंत सकाळच्या सत्रात मल्ल रनिंगसह व्यायाम, पायऱ्या चढणे-उतरणे, सपाटे मारणे, जोरबैठका आदींसह शारीरिक तंदुरुस्तीचे व्यायाम करतात. तर, संध्याकाळच्या सत्रात दोरावर चढणे, कुस्तीतील वेगवेगळ्या डावपेचांचे कौशल्य आत्मसात करणे, यासह मॅच प्रॅक्टिसचा सराव खेळाडू करतात.

आखाडे सुरू झाल्याने आनंद...

कुस्ती या खेळात स्पर्श अनिवार्य आहे. त्यामुळे खेळाडू एकमेकांना भिडतात. कोरोनामुळे यावर अनेक दिवस बंदी होती. आता पुन्हा आखाडे सुरू झाल्याने आनंद आहे. अनलॉकनंतर खेळाडूंचे प्रशिक्षण सुरू असून, ही कुस्तीसाठी आनंदाची बाब असल्याचे एनआयएस प्रशिक्षक प्रा. आशिष क्षीरसागर यांनी सांगितले.

मेहनत चालू, स्पर्धा व्हाव्यात...

गेले अनेक दिवस मैदाने बंद असल्याने घरच्या घरीच व्यायाम केला. आखाडे सुरू झाल्याने कुस्तीच्या सरावाला सुरुवात केली आहे. लवकरच स्पर्धाही व्हाव्यात, जेणेकरून खेळाडूंच्या कौशल्याला चालना मिळेल, असे राष्ट्रीय कुस्तीपटू महेश तातपुरे म्हणाला.

महाराष्ट्र केसरीसाठी तयारी...

कोरोनामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. गतवर्षी औसा तालुक्यातील टाक्याचा मल्ल शैलेश शेळके उपमहाराष्ट्र केसरी ठरला होता. यंदाच्या वर्षी कोरोनामुळे काही काळ व्यर्थ गेला आहे. मात्र, अनलॉक झाल्याने पुन्हा कुस्तीचे आखाडे रंगले आहेत. लातूरचा मल्ल शैलेश शेळकेदेखील महाराष्ट्र केसरीसाठी तयारी करीत आहे.

Web Title: Shaddu started walking again in wrestling training!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.