लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : ग्रामीण भागातील संगांयो-इंगांयोच्या पात्र लाभार्थ्यांना योजनेचा थेट लाभ देण्यासाठी लातूर ग्रामीण संगांयो समितीने पुढाकार घेतला असून, तालुक्यातील टाकळी ब. येथे समाधान शिबिर घेण्यात आले. या शिबिरातून शपथपत्र करणे, अर्ज भरणे, दाखल करणे आदी सेवा गावातच उपलब्ध झाल्याने निराधारांची सोय झाली आहे.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर तालुक्यातील गावांमध्ये समाधान शिबिरांचे आयोजन करुन लाभार्थ्यांना गावपातळीवर सेवा देण्यात येत आहे. टाकळी ब. येथे घेण्यात आलेल्या शिबिरात गावातील विधवा, परित्यक्ता, वयोवृद्ध यांच्यासह कोविड-१९मुळे निराधार झालेल्या लाभार्थ्यांची सर्व अर्जप्रक्रिया करुन शिबिर यशस्वी करण्यात आले. यावेळी संगांयो समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी ग्रामस्थांना निराधारांच्या योजनांबद्दल मार्गदर्शन केले. या शिबिरावेळी सदस्य धनंजय वैद्य, उपसभापती प्रकाश उफाडे, वसंतराव उफाडे, सरपंच शशिकांत सोट पाटील, अशोक उफाडे, विशाल उफाडे, त्र्यंबक चव्हाण, तलाठी राठोड, नरसिंग दरकसे, शिरीष गांधले, प्रवीण कोद्रे, राहुल पाचेगावकर, गजानन पाटील, मुनीर शेख, सालार शेख, भाऊसाहेब पाटील, लक्ष्मण उफाडे, रामचंद्र साळुंके, संजय उफाडे आदींसह टाकळी ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक उपसभापती प्रकाश उफाडे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष अन्नभुले यांनी केले तर शिरीष गांधले यांनी आभार मानले.