लातूर : शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे संस्थापक संचालक तथा ज्येष्ठ विधिज्ञ किशनराव भाऊराव सोनवणे (वय ८९) यांचे मंगळवारी दुपारी एक वाजता वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मारवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे सहसचिव सुनील सोनवणे यांचे ते वडील होत. दरम्यान, संस्थेच्या वतीने आनंद माने, डॉ.सुहास गोरे, मकरंद देशमुख, महादेव मुळे, प्रकाश देशमुख व राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महादेव गव्हाणे यांनी किशनराव सोनवणे यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी वकील व्यवसायात दिलेले योगदान आणि संस्थेचे संचालक, सहसचिव म्हणून केलेल्या कामाचा गौरव केला. संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ.गोपाळराव पाटील, सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांच्यासह सर्व सदस्यांसह प्राध्यापक, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.