लातूर : शहरासह जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालये प्रदीर्घ काळानंतर गजबजली. पहिल्या दिवशी सोमवारी जवळपास ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. ऑनलाइनला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिकवणीबरोबरच मित्रांना भेटण्याची उत्कंठा होती. त्यामुळे शहरातील काही महाविद्यालयांत ७५ टक्के उपस्थिती राहिली.
शहरातील सर्वच महाविद्यालय प्रशासनांनी विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देताना ऑक्सिमीटरने तपासणी केली. त्यानंतरच वर्गात प्रवेश देण्यात आला. ज्यांच्याकडे मास्क नाही, अशा विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येत होता. शहरातील राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद कला, वाणिज्य, विज्ञान, विधी महाविद्यालय तसेच महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, सुशीलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालयांसह अन्य महाविद्यालयांमध्ये वर्षभरानंतर विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये प्रवेश केला. गतवर्षी मार्च महिन्यापासून वर्ग बंद होते. या शैक्षणिक वर्षात लाॅकडाऊन असल्याने वर्ग बंद होते. सोमवारी ऑफलाइन वर्ग सुरू झाले. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शहरातील सर्वच महाविद्यालयांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे तंतोतंत पालन झाले. महाविद्यालय प्रशासनाने खबरदारी घेतली होती. ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करून मास्क असलेल्या विद्यार्थ्यांनाच वर्गामध्ये प्रवेश देण्यात आला. बहुतांश महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारांवरच ही तपासणी करण्यात येत होती. वर्गामध्ये एका बेंचवर एक विद्यार्थी अशी आसनव्यवस्था होती.
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
बी.एस्सी. ते एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांची संख्या ११०० आहे. यातील ५० टक्के विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना वर्गामध्ये प्रवेश देताना तपासणी करण्यात आली. वर्षभरानंतर विद्यार्थी आल्याने आनंद वाटला. ज्यांना येणे शक्य नाही, त्यांच्यासाठी ऑनलाइन अभ्यास वर्ग सुरू आहेत. -प्राचार्य डाॅ. जयप्रकाश दरगड
पेन देऊन विद्यार्थ्यांचे केले स्वागत
सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने विद्यार्थ्यांना पेन आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयांमध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलनाने हा उपक्रम राबविला.
जिल्हाध्यक्ष प्रीतम दंडे, शहराध्यक्ष नागेश सातपुते, प्रवीण करमले, पवन कांबळे यांनी आपल्या मित्रांचे पेन आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
मास्क, फिजिकल डिस्टन्स आणि वारंवार हात धुण्याबाबत सम्यक विद्यार्थी आंदोलनाने यावेळी जनजागृतीही केली.