सतत निसर्गाची अवकृपा असलेल्या मराठवाड्यास नेहमीच पाण्याची टंचाई असते. लोकनेते विलासराव देशमुख यांनी कृष्णा-मराठवाडा प्रकल्पातून २१ टीएमसी पाण्याच्या प्रकल्पाला मंजुरी देऊन धोरणात्मक निर्णय घेतला. त्यांनी पाण्याच्या प्रश्नास नेहमीच प्राधान्य देऊन वेळोवेळी पाण्याची उपलब्धता करून दिली. लातूर जिल्ह्यात बराजची निर्मिती करून त्या माध्यमातून खूप मोठा आधार लातूरकरांना दिला. दरवर्षी अत्यल्प प्रमाणात पडणारा पाऊस व वाढत्या लोकसंख्येनुसार होणारी पाण्याची मागणी लक्षात घेऊन विविध माध्यमांतून लातूर जिल्ह्यास पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे बनले असताना पालकमंत्री अमित देशमुख यांच्यासह मराठवाडा वॅाटर ग्रीडचा प्रकल्प सुरू होण्याच्या दृष्टीने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे धीरज देशमुख यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. तसेच पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करून ते पाणी कसे उपयोगात आणता येईल यासाठी प्रयत्न सुरू असून त्या अनुषंगाने मंत्री महोदयांनी संबंधित विभागास अभ्यास करण्याचे निर्देशदेखील दिले आहेत.
प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा...
मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला पहिल्या टप्प्यात मंजुरी देऊन महाविकास आघाडी सरकारने मराठवाड्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत सकारात्मक दृष्टीचा अवलंब केला आहे. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, शंकरराव गडाख व मंत्रिमंडळातील इतर सदस्यांचे आभार व्यक्त करून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी सर्वजण प्रयत्नशील असल्याचे आ. धीरज देशमुख यांनी सांगितले.