औसा तालुक्यातील बेलकुंड ग्रामपंचायत हद्दीत एका बार अँड रेस्टॉरंटला परवानगी देण्यात आली हाेती. ती चुकीची असल्याचा आराेप करत सदरची परवानगी रद्द करवी, अशी मागणी बेलकुंडचे विष्णू कोळी आणि उपसरपंच सचिन पवार यांनी साेमवारपासून ग्राम पंचायत कार्यालयासमाेर उपोषण सुरू केले होते. दरम्यान, मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना उपाेषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घ्यावे, असे सांगितले. मात्र, ठोस अश्वासन न मिळाल्याने आंदाेलन सुरुच ठेवण्यात आले हाेते. बुधवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आर.एम. बांगर यांनी सदर हाॅटेलने सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण थांबविण्यात आले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आर.जे. राठोड, भादा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एन.डी. लिंगे, पोलिस उपनिरीक्षक महेश मुळीक, कमाल शेख, चंद्रकांत सूर्यवंशी, छावा संघटनेचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे, तंटामुक्ती अध्यक्ष शकील शेख, ग्रामपंचायत सदस्य अजिंक्य अपसिंगेकर, आण्णासाहेब बदुले, बाळासाहेब वाघमोडे, बालेखाँ पठाण, बलभीम बंडगर, गणेश यादव, कैलास कांबळे यांच्यासह गावातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बेलकुंड कडकडीत बंद...
दोन दिवसांपासून बेलकुंड ग्रामपंचायत कार्यालयासमाेर सुुर करण्यात आलेल्या उपाेषणाला पाठिंबा म्हणून गावातील नागरिकांनी बुधवारी गावबंद ठेवण्यात आले हाेते. गावातील दुकानादारांनी आपली दुकाने कडकडीत बंद ठेवली हाेती. प्रशासन कारवाई करत नसल्याने राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको करण्याच्या पवित्र्यात गावकरी हाेते. मात्र कारवाईचे आश्वासन मिळाल्याने रस्तारोको रद्द आणि उपोषण मागे घेण्यात आला. त्यानंतर गावातील व्यवहार सुरळीत झाले.