किडीज् इन्फो पार्कमध्ये गुणवंतांचा सत्कार
लातूर : पेठ येथील किडीज् इन्फो पार्कमध्ये २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात केंद्रीय माध्यमिक परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये मानसी आपेट, ऋतुजा कठाडे, श्रेयस वाडीकर, रिया चांडक यांचा समावेश आहे. त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्राचार्या प्रीती शहा, शाळेचे अध्यक्ष देवांग शहा, राहुल पवार, दत्ता चौधरी, शिवदर्शन पवार, संतोष घुटे, विक्रम वाघमारे, देवशेटे यांची उपस्थिती होती. शाळेचे ४७ विद्यार्थ्यांपैकी २३ विद्यार्थी ९० टक्के तर १५ विद्यार्थी ८० टक्क्यांच्या पुढे, तर आठ विद्यार्थी ७० टक्क्यांच्या पुढे असल्याचे सांगण्यात आले.
गीतगायन स्पर्धेतील यशाबद्दल सत्कार
लातूर : येथील श्री केशवराज प्राथमिक विद्यालयाची विद्यार्थिनी आराध्या कदम हिने ऑनलाईन गीतगायन स्पर्धेत यश मिळविले आहे. त्याबद्दल तिचा श्री केशवराज प्राथमिक विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. मनोज शिरूरे, मुख्याध्यापक शिवाजीराव हेंडगे, आदिनाथ कदम आदींसह शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. या गीतगायन स्पर्धेत ४०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये इयत्ता दुसरीत शिकत असलेल्या आराध्या हिने यश मिळविले आहे.
जिल्ह्यात लोकसंख्या स्थिरता पंधरवडा
लातूर : कुटुंब नियोजन पद्धतीचा जनतेमध्ये प्रचार व प्रसार करण्यासाठी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जात आहे. त्याच अनुषंगाने ११ ते २४ जुलै या कालावधीत जिल्ह्यात लोकसंख्या स्थिरता पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. या पंधरवड्याचे उद्घाटन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, डॉ. गंगाधर परगे, डॉ. बालाजी बरूरे, डॉ. अर्चना पंडगे, डॉ. मोनिका पाटील, डॉ. सतीश हरिदास, डॉ. वाघमारे, डाॅ. धुमाळ, डॉ. सारिका देशमुख यांची उपस्थिती होती.
वसुंधरा प्रतिष्ठान तर्फे रिंग रोड परिसरात वृक्षारोपण
लातूर : लातूर शहरातील वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने रिंग रोड परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वसुंधरा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अमोलअप्पा स्वामी, शिवाजी निरमनाळे, जितेंद्र मुटकुळे, सौदागर माने, विक्रम शितोळे यांची उपस्थिती होती. प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संवर्धन केल्यास ३३ टक्के वनक्षेत्र होण्यास वेळ लागणार नाही. वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
अहमदपूर येथून ट्रॅक्टरच्या बॅटऱ्यांची चोरी
लातूर : अहमदपूर येथून दोन ट्रॅक्टरच्या बॅटरीज चोरीला गेल्याची घटना १४ जुलै रोजी घडली. याप्रकरणी फिर्यादी शेख माजिद रजूसाहब (रा. भारत कॉलनी, अहमदपूर) यांच्या तक्रारीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. राजगीरवाड करीत आहेत. या घटनेत दहा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.