शिरूर अनंतपाळ : तालुक्यात दोन दिवसात झालेल्या रिमझिम पावसाने खरीप हंगामातील पिकांना आधार मिळाला आहे. त्यामुळे मशागतीच्या कामाला वेग आला असून, फवारणीपेक्षा कोळपणीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.
तालुक्यात २८ हजार ३८४ हेक्टर खरीप लागवडीचे क्षेत्र असून, त्यापैकी २३ हजार हेक्टरवर सोयाबीन पेरा करण्यात येत आहे. मात्र, मध्येच पावसाने पाठ फिरवली होती, त्यामुळे पेरणीचा वेग मंदावला होता. मृगाच्या मुहुर्तावर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पिके उगवली. परंतु, पावसाअभावी दुपार धरू लागली होती. दरम्यान, मागील दोन दिवसात रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे संथगतीने सुरू असलेल्या पेरण्यांचा वेग वाढला आहे. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी आंतरमशागतीची कामे सुरू केली आहेत. मशागतीच्या कामाला गती आली आहे. तणनाशक, कीटकनाशक फवारणी सुरू करण्यात आली आहे. काही शेतकरी फवारणीपेक्षा कोळपणीवर भर देत असल्याचे दिसून येत आहे.
फवारणीपेक्षा कोळपणीवर उत्तम...
खरीप हंगामातील पिकांच्या वाढीसाठी तणनाशक फवारणीपेक्षा कोळपणी करणे अधिक फायद्याचे असते. कारण तणनाशक फवारणी केल्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होतो, असे प्रगतशील शेतकरी धोंडीराम कारभारी, विठ्ठल पाटील, संजीव गुणाले, कल्याणराव बिरादार यांनी सांगितले.