लातूर : काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने खताच्या दरात वाढ केली होती. मात्र त्याविरोधात राज्यभर निवेदने देण्यात आली. परिणामी, खतांची दरवाढ केंद्र सरकारने मागे घेतली. मात्र या दरवाढीच्या काळात अनेक शेतकऱ्यांनी खत खरेदी केले आहे. या शेतकऱ्यांची लूट होत असून, त्यांच्याकडून घेतलेले अधिकचे पैसे परत करावे, अशी मागणी अ. भा. छावा संघटनेने केली आहे.
खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शेतकरी खते, बियाणांच्या जुळवाजुळवीत आहे. मध्यंतरी खताच्या दरात वाढ करण्यात आली होती. मात्र दरवाढ मागे घेण्यासाठी अ. भा. छावा संघटनेने केंद्र सरकारला निवेदन दिले होते.
दरवाढ आता कमी झाली आहे. मात्र काही व्यापाऱ्यांनी अधिकच्या दराने खताची विक्री करून शेतकऱ्यांची लूट केली आहे. त्यामुळे अधिकचे घेतलेले खताचे पैसे व्यापाऱ्यांनी परत करावेत. अन्यथा अ. भा. छावा संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा छावा संघटनेचे विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी दिला आहे.