आरोग्य विभागाकडून उदगीर तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात आठ मार्चपासून मोफत कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले. आठवड्यातील सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस लसीकरणासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. हंडरगुळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंदणी कक्ष, लसीकरण कक्ष, विश्रांती घेण्यासाठी निगराणी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, आशा स्वयंसेविका, शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी आदींनी लस घेतली आहे, शिवाय ६० वर्षांवरील सर्व नागरिकांना आणि ४५ ते ६० वयोगटांतील बीपी, शुगर, किडनी, अन्य आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे.
हाळी हंडरगुळी हे बाजाराचे गाव असल्याने परिसरातील पंधरा ते वीस गावांतील नागरिकांचा येथे दैनंदिन वर्दळ असते. परिणामी, येथील आरोग्य केंद्र नागरिकांच्या सोयीचे झाले आहे. कोरोना लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ.आकाश पवार, डाॅ.विष्णू गायकवाड यांनी केले आहे.