तालुक्यातील रावणकोळा ते राठोडवाडी तांडा हा दीड किमीचा कच्चा रस्ता काही वर्षांपूर्वी मग्रारोहयोतून तयार करण्यात आला होता. त्यामुळे तांड्यावरील नागरिकांना ये- जा करण्यास काही प्रमाणात सोयीचे झाले. राठोडवाडी तांड्यावर जवळपास ५०० नागरिकांची वस्ती आहे. या वस्तीवरील नागरिकांना दररोजच्या कामासाठी रावणकोळा गावात ये-जा करावी लागते. तसेच वस्तीवर विद्यार्थांना इयत्ता सातवीपुढील शिक्षणासाठी रावणकोळा अथवा अन्य गावात ये- जा करावी लागते.
दोन दिवसांपूर्वी या भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कच्च्या रस्त्यावरील भराव वाहून गेला आहे. परिणामी, आता वस्तीवरील नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तांड्यावरील एखादा व्यक्ती आजारी पडल्यास त्याला दवाखान्यात नेण्यासाठी पाठीवरुन घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. हा रस्ता तत्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.
रस्त्याचे डांबरीकरण करावे...
सदरील कच्च्या रस्त्यावरील भराव वाहून गेला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करुन रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण करावे. तसेच पूल मजबूत करावा, अशी मागणी सरपंच ज्योत्स्ना सत्यवान दळवे पाटील, उपसरपंच सुनील राठोड यांच्यासह राठोडवाडी तांड्यावरील नागरिकांनी केली आहे.