चारचाकी व दुचाकी वाहनांऐवजी सायकलवर विविध भागात जावून नागरिकांच्या समस्या समजून घेत ते सोडविण्याचा प्रयत्न करताना मुख्याधिकारी राठोड दिसून येत आहेत. निवासस्थानापासून पालिकेच्या कार्यालयाला अनेकदा सायकलवरून येत आहेत. आजपर्यंत अनेक मुख्याधिकारी पालिकेला लाभले; मात्र सायकलवारी करणारे पहिलेच मुख्याधिकारी राठोड ठरले आहेत. उदगीर हे मोठे तालुक्याचे ठिकाण आहे. सध्याच्या युगात प्रत्येकाकडे छोटे- मोठे वाहन असल्याने शहराच्या प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे विविध आजार होत असून, सायकल वापरणे ही आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर झाले आहे. यासाठी अगोदर स्वत: सायकल वापरून न. प. कर्मचारी व अधिकारी यांनी ही सायकलचा वापर करावा, म्हणून नवीन वर्षांत प्रत्येक शुक्रवारी नो व्हिकल डेनिमित्त सायकल किंवा चालत कार्यालयात यावे, यासाठी एक लेखी आदेश मुख्याधिकारी राठोड यांनी गुरुवारी काढला आहे.
नूतन वर्ष १ जानेवारी २०२१ पासून पालिकेतील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी आपल्या कुठल्याही दुचाकी किंवा चारचाकी वाहनांचा वापर न करता त्यांनी पायी किंवा सायकलद्वारे कार्यालयास येण्याचे आदेश मुख्याधिकारी राठोड यांनी काढले आहे. असे दिसून न आल्यास प्रत्येकी ५०० रुपये दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. ही दंडाची रक्कम सार्वजनिक हिताच्या दृष्टीने वापरण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी भारत राठोड यांनी दिली.