अहमदपूर : कोरोनाच्या संकटाने ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मात्र, शहरासह तालुक्यात सातत्याने मोबाइलची रेंज गुल होत असल्याने ऑनलाइन शिक्षणात व्यत्यय येत आहे. परिणामी, शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांतून संताप व्यक्त होत आहे. रेंजसाठी उंचीवरच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जावे लागत आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुले शिक्षणाच्या प्रवाहातून दूर राहू नयेत म्हणून ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. नर्सरीपासून ते उच्चशिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. मोबाइल, संगणकावरून शिक्षण देण्यात येत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील मुले शिक्षण घेत आहेत. तालुक्यात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या ५८ हजार आहे. त्यात शहरी भागात २५ हजार आणि ग्रामीण भागात ३३ हजार विद्यार्थी आहेत.
शाळेतील शिक्षकांनी वॉटस्ॲप ग्रुप तयार करून त्यावर अभ्यास देत आहेत. मुलांनी केलेल्या अभ्यासाचीही तपासणी केली जात आहे. कोरोनामुळे शाळा जरी ऑफलाइन असल्या तरी विद्यार्थी मात्र ऑनलाइन अभ्यासात व्यस्त आहेत. मात्र, शहरासह ग्रामीण भागात सातत्याने मोबाइलची रेंज गुल होत आहे. त्यामुळे शिक्षणात व्यत्यय येत आहे.
शासनाने डिजिटल इंडियाच्या माध्यमातून ग्रामपंचायत, डाक कार्यालय, अंगणवाड्यांना इंटरनेट सेवा जोडून विविध योजना राबवीत आहेत; परंतु येथे मोबाइलला पुरेशी रेंज राहत नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणीस सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, मोबाइलवर कॉल केला तरी व्यवस्थित रेंज मिळत नाही. त्यामुळे सातत्याने संवाद तुटत आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये सुरू झाली नाहीत. शासनाने ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आहे; परंतु शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात नेटवर्क राहत नाही. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.
इयत्तानिहाय ग्रुप तयार...
तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी इयत्तानिहाय विद्यार्थ्यांचे वॉटस्ॲप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. त्या- त्या वर्गाचे शिक्षक संपर्क करीत असतात. शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना लिंक दिली जाते, असे गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांनी सांगितले.
रस्ता खोदकामामुळे अडचण...
शहरास ग्रामीण भागातील हडोळती, शिरूर ताजबंद, किनगाव येथे ४ जी इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. वायगाव, कुमठा, अंधोरी, चिखली, सुनेगाव सांगवी येथे २ जी सेवा उपलब्ध आहे. महामार्गाच्या खोदकामामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस बीएसएनएलच्या वायरचे नुकसान होत आहे. ही वायर सतत तुटत आहे. ग्रामीण भागात विद्युत पुरवठा व्यवस्थित नसल्यामुळे अडचण येत आहे, असे बीएसएनएलचे अधिकारी बी.एन. गुट्टे यांनी सांगितले.