शिरूर अनंतपाळ तालुक्यात यंदा रबीचे क्षेत्र वाढले असले तरी ज्वारीचे क्षेत्र घटले आहे. ज्वारीच्या तुलनेत हरभऱ्याचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे ज्वारीचा कडबा खरेदी करण्यासाठी शेतकरी आतापासूनच धडपड करीत असून, मिळेल त्या भावाने कडब्याची खरेदी करीत आहेत.
शेतीच्या मशागतीसाठी यांत्रिक पद्धतीचा वापर वाढत चालला असला तरी इंधनाचे भाव गगनाला भिडले असल्याने यांत्रिक पद्धतीने शेती करणारे शेतकरीसुद्धा पुन्हा बैलबारदाणा उभा करीत आहेत. त्यामुळे मशागतीच्या कामात पशुधनाचे महत्त्व पुन्हा वाढले आहे; परंतु पशुधन जगविण्यासाठी कडब्याची आवश्यकता असल्याने शेतकरी आतापासूनच कडब्याची मिळेल त्या भावाने खरेदी करीत आहेत.
इंधन वाढीचा मशागतीवर परिणाम...
शेतीच्या मशागतीसाठी मध्यंतरीच्या काळात लहान-मोठ्या ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बैलबारदाणा मोडून पेरणीपासून नांगरणीपर्यंतची सर्व कामे ट्रॅक्टरच्या मदतीने केली जात होती. मात्र, सध्या इंधनाचे भाव गगनाला भिडले असून, यांत्रिक पद्धतीच्या मशागतीला ब्रेक लागला आहे. अनेक शेतकऱ्यांनी बैलबारदाणा उभा केला आहे. त्यामुळे इंधन दरवाढीचा यांत्रिक मशागतीवर परिणाम झाला आहे. शेतकरी पशुधनाच्या मशागतीला आता पसंती देत आहेत.
कडबा खरेदीसाठी कर्नाटकात धाव...
शिरूर अनंतपाळ तालुक्यात ज्वारीचे क्षेत्र घटले असल्याने कडबा खरेदी करण्यासाठी शेतकरी शेतशिवार पालथे घालत आहेत; परंतु कडबा मिळत नसल्याने अनेक जण शेजारी असलेल्या कर्नाटक राज्यातील मेहकर, भालकी, बीदर परिसरातून मिळेल त्या भावाने कडब्याची खरेदी करीत आहेत. परिणामी, कडब्याला आता सोन्याचा भाव आला आहे.
शेकडा दीड हजारापेक्षा अधिक भाव...
ज्वारीचा कडबा खरेदी करण्यासाठी शेतकरी आतापासूनच धडपड करीत आहेत. टेम्पो, ट्रॅक्टर, बैलगाडी आदींच्या साह्याने कडब्याची जुळवाजुळव करीत आहेत. त्यामुळे शेकडा दीड हजारापेक्षा जास्त रक्कम मोजावी लागत आहे. शिवाय, वाहतुकीचा वेगळा खर्च करावा लागत असल्याचे शेतकरी मेजर दिलीप बिरादार, भाऊराव पाटील, कल्याणराव बिरादार, रमेश पाटील, सिद्धार्थ स्वामी यांनी सांगितले.