चाकूर : समाज कल्याण विभागाच्या वतीने तालुक्यात मुलांचे आणि मुलीचे वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी भाडेतत्त्वावर जागा घेण्यात आली. परंतु, या इमारती अपुऱ्या पडत असल्याने विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लवकरात लवकर जागेचा प्रश्न सोडवून इमारत उभी राहावी, अशी अपेक्षा तालुक्यातील नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
चाकूर येथे वसतिगृहाची स्वतःची इमारत उभारण्यासाठी जिल्हा समाज कल्याण विभागाची उदासीनता दिसून येत आहे. जागा मिळावी म्हणून कागदोपत्री काम सुरू आहे. परिणामी, वसतिगृहाच्या जागेचा प्रश्न गेली अनेक वर्षांपासून अद्याप सुटला नाही. समाज कल्याण विभागाने १९९६ मध्ये मुलींचे वसतिगृह सुरू केले. १९९६ ते २००३ या कालावधीत मासिक भाडे १२ हजार ८०० रुपयांवर होते. १९९६ ते २०१४ या १८ वर्षांच्या काळात २७ लाख ६४ हजार ८०० रुपये शासनाला भाडेपोटी मोजावे लागले. फेब्रुवारी २०१४ मध्ये या भाडे करारात वाढ झाली. मासिक भाडे ४८ हजार ७३० रुपयांच्या घरात गेले. एप्रिल २०२१ पर्यंत ६७ लाख ११ हजार ९३० शासनाला द्यावे लागले. वसतिगृहाची क्षमता ७५ आहे. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालय बंद आहेत. वसतिगृहात इयत्ता आठवीपासूनच्या पुढील शिक्षणासाठी प्रवेश दिला जातो. सध्याची जागा अपुरी पडत आहे. समाज कल्याण विभागाने १५ जून २०११ रोजी भाडेतत्त्वावर जागा घेत मुलांचे वसतिगृह सुरू केले. प्रारंभी मासिक भाडे आठ हजार रुपये होते. दोन वर्षांनंतर दुसऱ्या जागेवर स्थलांतर करण्यात आले. त्या भाडेपोटी शासनाला १ लाख ९२ हजार रुपये मोजावे लागले. १ जून २०१३ पासून सुरू झालेल्या या वसतिगृहाच्या इमारतीपोटी मासिक भाडे ७९ हजार ६११ रुपये भाडे द्यावे लागत आहे. एप्रिल २०२१ अखेर भाडेपोटी ७६ लाख ७५ हजार ४३४ रुपये द्यावे लागले. मुलामुलींचे वसतिगृहासाठी एकूण १ कोटी ९० लाख ७ हजार ३६४ रुपये शासनाला मोजावे लागले आहेत. वसतिगृहाची स्वतंत्र इमारत असावी, यासाठी शासनाने इमारत बांधण्यासाठी निधी दिलेला आहे. परंतु, समाज कल्याण विभाग जागेचा प्रश्न सोडवित नसल्याने इमारत उभी राहू शकलेली नाही. शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेशेजारी सरकारी जागा आहे. ती तरी वसतिगृहासाठी द्यावी, अन्यथा तेथे नगरपंचायतीचे कार्यालय उभारावे, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे.
वसतिगृहासाठी किमान तीन एकर जमिनीची अवश्यक हवी आहे. सरकारी जमीन उपलब्ध असेल तर त्याचा विचार करण्यात येईल. शासकीय जमीन उपलब्ध न झाल्यास खासगी जमीन विकत घेऊन तेथे वसतिगृह बांधण्यासाठी समाज कल्याणचे अधिकारी यांच्याशी बोलणी झाली आहे. लवकरच जागेचा प्रश्न मार्गी लागेल. - आ. बाबासाहेब पाटील
चाकूर येथील मुलामुलींचे वसतिगृहाची भाडेतत्त्वावर घेतलेली इमारत अपुरी पडत आहे. त्यामुळे वसतिगृह बांधण्यासाठी जमिनीची प्रत्यक्ष पाहणी प्रक्रिया सुरू केली आहे. - एस .एन. चिकुर्ते, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, लातूर
चाकूर शहरात आणि नजीक सरकारी जागा उपलब्ध नाही. जिल्हा बँकेशेजारी जागा आहे. ती जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. चाकूर ग्रामपंचायत होती. नगरपंचायत झाल्याने ही जागा घेण्याचा प्रस्ताव नगरपंचायतचा आहे. त्यामुळे सरकारी अन्यत्र जागा नाही. -डॉ. शिवानंद बिडवे, तहसीलदार, चाकूर