जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. शनिवारी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी रस्त्यावर उतरून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. पोलिसांच्या पथकाने शहरातील विविध आस्थापनांवर कारवाई करीत दंड वसूल केला. फिजिकल डिस्टन्स न राखणे, ग्राहकांची गर्दी, मास्कचा वापर न करणाऱ्या २५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात येऊन अडीच हजारांचा दंड वसूल करण्यात आला. विनाकारण रस्त्यावर वाहन घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
कोरोनाच्या संकटाच्या काळात नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये. आवश्यक कामासाठी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.