कोरानाचा संसर्ग रोखण्यासाठी येथील कोरोना नियंत्रण समितीचे प्रमुख तहसीलदार अतुल जटाळे यांनी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी नगरपंचायत आणि पोलिसांचे संयुक्त पथक स्थापन केले आहे. विकेंड लॉकडाऊन म्हणजे शनिवार व रविवारी कडक कारवाई करण्यात येत आहे. दोन दिवसांत २४१ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये विनाकारण फिरणे, मास्कचा वापर न करणे, फिजिकल डिस्टन्स न राखणे याबाबत कारवाई करण्यात आली.
राज्य मार्गावरील महात्मा बसवेश्वर चौक, नगरपंचायत कार्यालय, पेट्रोल पंप आदी ठिकाणी पथकाने दोन्ही दिवशी दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे या दोन दिवसांत बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत होता.
विनामास्क आढळले ६० जण...
विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांमध्ये दुचाकी, चारचाकी घेऊन फिरणाऱ्याची संख्या मोठी आहे. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्या ६० जणांवर, तर १८१ वाहनधारकांवर मोटारवाहन कायद्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली. दोन दिवसांत २४१ जणांकडून ९० हजारपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला.
शेतीविषयक कामासाठी कारवाई नको...
कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत शेतीविषयक कामांसाठी सवलत दिली आहे. त्यामुळे शेतीविषयक कामासाठी बाजारपेठेत जाणाऱ्यांवर कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक व्यंकटराव पाटील यांनी तहसीलदारांकडे केली आहे.