शिरुर अनंतपाळमध्ये काही नागरिक अत्यावश्यक साहित्य खरेदीच्या नावाखाली रस्त्याने फिरत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत सकाळच्या वेळी प्रचंड गर्दी होत आहे. बुधवारी या पथकाने उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार अतुल जटाळे, मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्या ४६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये १९ जण विनामास्क तर ४ दुकानदारांनी नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ दुकाने सुरू ठेवल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे एकंदर २३ नागरीकांवर आर्थिक दंडाची कारवाई केली असून, १२ हजार ९०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.
महिनाभरात ५० हजारांचा दंड वसूल...
जीवनावश्यक वस्तूच खरेदी करता यावी म्हणून सकाळी ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत. यामध्ये अनेकजण विनामास्क फिरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली. गेल्या महिनाभरात नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करणा-या व्यक्तींकडून ५० हजारांपेक्षा अधिक दंड वसूल केला आहे.