ग्रामीण भागातील शेतकरीही कृषी तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत. त्यामुळे भाजीपाल्यासह फळबागा, विविध प्रकारची उत्पादने घेत आहे. मात्र, केवळ १० ते १५ टक्के शेतकरी बियाणे, खते, फवारणी औषधींचे फायदे, तोटे जाणतो. इतर शेतकरी ऐकीव माहितीवरच शेती करतात. निरक्षर, कमी शिक्षण झालेले शेतकरी इंग्रजी वाचू शकत नाहीत. शेतकऱ्यांना सदरील माहिती वाचता यावी, त्यामुळे मराठी भाषेत उत्पादनावरील माहिती देण्यात यावी. पॅकिंगवर अथवा गोणीवर तसेच बिलांवर फक्त इंग्रजीचाच वापर केलेला आढळतो, त्यामध्ये मराठी या मातृभाषेचा कुठेही उल्लेख आढळून येत नाही. खते, बियाणे, कीटकनाशकांचा वापर कसा करायचा, त्याची एक्स्पायरी कधी याची माहिती इंग्रजीत असल्याने समजत नाही. यातून अनेकदा शेतकऱ्यांना तोटा झाला आहे.
पॅकिंगवर मराठी भाषाच हवी...
विक्रेते आपला माल कसा विकला जाईल याचीच काळजी घेतात. मात्र, उत्पादन किती, कसे निघते. फवारणीची प्रक्रिया कोणती, किती पाण्यात किती कीटकनाशक वापरावे यांची तंतोतंत माहिती देत नाहीत. त्यामुळे बियाणे, खते, कीटकनाशके यांच्या पॅकिंगवर मराठी भाषेतूनच माहिती देण्यात यावी, यासाठी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे मागणी केली आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यास ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मदत होईल, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल यांनी सांगितले.