अहमदपूर : बांधकाम साहित्याचे दर गगनाला भिडल्याने घरकुल व खासगी बांधकाम करणारे अडचणीत सापडले आहेत. स्टील ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल, सिमेंटचे पोते ४०० रुपये, वाळू ३० हजारांच्या पुढे गेली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य अडचणीत सापडले आहेत.
अहमदपूर शहरात बांधकामे सुरू असून अनेकांनी गृहकर्ज व खाजगी कर्ज घेऊन लॉकडाऊनमध्ये बांधकामास सुरुवात केली. मात्र, मार्चमध्ये अचानक लॉकडाऊन झाल्यामुळे स्टीलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले. ४५ रुपये किलो असणाऱ्या स्टीलचा दर मार्चमध्ये ५४, एप्रिलमध्ये ६५ तर मेमध्ये ७५ रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे अनेकांच्या बांधकामाचे बजेट कोलमडले आहे. तसेच सिमेंटच्या भावातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून ३२० रुपयांचे पोते ३८० रुपये देऊनही सध्या मिळणे कठीण झाले आहे.
सध्या ऑक्सिजनचा पुरवठा या उद्योगास होत नसल्यामुळे सिमेंट व लोखंडाचे उत्पादन थांबल्याचे ठोक व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे दरवाढ आणखीन काही दिवस राहणार आहे. या तेजीमुळे मोठ्या कन्स्ट्रक्शन साइट बंद आहेत. घर बांधकाम करणारे सर्वसामान्य अडचणीत सापडले आहेत. मन्याड व गंगाखेड येथील वाळूच्या दरामध्येही मोठी वाढ झाली असून ३० हजार रुपये ५ ब्रास वाळूचा भाव झाला आहे. गृहकर्ज घेतलेल्यांचे बजेट कोलमडले आहे.
स्टील इंडस्ट्रीवर परिणाम...
स्टील उद्योगासाठी ऑक्सिजनची गरज असते. मात्र, कोरोनामुळे सध्या ऑक्सिजन मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे स्टीलच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याचे व्यापारी व्यंकटेश सोनी यांनी सांगितले.
बांधकामाचे भाव वधारले...
लॉकडाऊनमध्ये सर्वच बांधकाम साहित्याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे मजुरीचे दरही वाढले आहेत. सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. काही दिवसांनंतर बांधकाम साहित्याचे दर आटोक्यात येतील, असे बांधकाम अभियंता शेख नईम यांनी सांगितले.
कामगारांवर उपासमारीची वेळ...
बांधकाम साहित्यात मोठ्या प्रमाणावर भाव वाढ झाल्याने सर्व कामे थांबली आहेत. बजेट असणाऱ्यांनीही काही दिवसांसाठी बांधकाम थांबविले आहे. दर कमी होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. त्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे बांधकाम क्षेत्रातील गुत्तेदार सादत शेख, जावेद मिस्त्री यांनी सांगितले.