हंडरगुळी हे बाजाराचे गाव असल्याने नागरिकांची नेहमी वर्दळ असते. शिवाय, प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही नेहमी ये-जा असते. हे लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मागील काही दिवसांपासून गावात तुंबलेल्या नाल्या, गटारींची सफाई केली जात आहे. तसेच जागोजागी साचलेला कचरा उचलण्यात येत आहे. घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती वर्तविली जात होती. शिवाय, कोरोनाचा संसर्ग वाढत होता. गावातील अस्वच्छता व रोगराई दूर करण्यासाठी उपाययोजना म्हणून तुंबलेल्या गटारी व नाली काढण्याचे काम केले जात आहे. नाली व गटारीतील निघालेली घाण, कचरा ट्रॅक्टरच्या साह्याने उचलून गावाबाहेर टाकला जात आहे. यापूर्वी गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले. नागरिकांच्या आरोग्याची काळजी व स्वच्छता ठेवण्याचा संकल्प असल्याचे सरपंच विजयकुमार अंबेकर, उपसरपंच बालाजी भोसले यांनी सांगितले.
मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे; नागरिकांतून समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:20 IST