यंदाच्या हंगामात मान्सून वेळेवर दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. औसा तालुक्यातील नागरसोगा परिसरातील यंदा सोयाबीन पेरा ७०० हेक्टर, मूग २००, उडीद १५०, संकरित ज्वारी १००, तूर २२५ हेक्टरवर अपेक्षित आहे. यंदा उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. सध्या शेतकरी आंतर मशागतीच्या कामात आहेत.
पेरणीपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. लॉकडाऊनमुळे शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि मशागत, बी - बियाणे, खतांच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. नागरसोगा, तुंगी खु., तुंगी बु., गाडवेवाडी, दावतपूर, जवळगा पो. दे., दापेगाव या भागात पेरणीपूर्व आंतरमशागतीची कामे सुरू आहेत.
कृषी विभागाची तयारी...
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार आणि योग्य भावात बी - बियाणे, खते मिळावीत म्हणून नियाेजन करण्यात आले आहे. वेळेवर पाऊस होईल, या आशेने शेतकरी लगबग करीत आहेत. यावर्षी प्रामुख्याने सोयाबीन, मूग, उडीद, तूर या पिकांवर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.