अहमदपूर : तालुक्यातील मौजे तीर्थ, किन्नी कदू येथील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी महावितरणकडे केली आहे.
तालुक्यातील तीर्थ, किन्नी कदू येथील शेतकरी शेतीचा वीजपुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी बेमुदत उपोषण करणार होते. यावेळी या शेतकऱ्यांची माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. कोरोनाच्या संकटकाळात आर्थिक संकट ओढवल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्याची परिस्थिती पाहून विनायकराव पाटील यांनी अहमदपूर येथील महावितरणच्या कार्यालयाला भेट देत तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर कार्यकारी अभियंता मठपती यांनी या सर्व शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पुढील १० ते १५ दिवसांच्या आत सुरळीत करू, असे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले उपोषण स्थगित केले. यावेळी अमित रेड्डी, गोविंद गिरी, शेतकरी रामचंद्र पेड, राजू पाटील, भगवान पाटील, माधव माने, संभाजी माने, भारती, मारोती पेड, गोविंद देवकते, हणमंत पेड, संभाजी माने, धोंडिबा देवकते, गोविंद पेड, तुकाराम गंगथडे, आदी उपस्थित होते.