जळकोट येथे शासकीय विश्रामगृह नसल्याने दौऱ्यावर आलेल्या लोकप्रतिनिधींसह शासकीय अधिकाऱ्यांची मोठी अडचण होत होती. रात्री मुक्कामासाठी त्यांना उदगीर अथवा नजीकच्या तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत होते. त्यामुळे येथे शासकीय विश्रामगृह बांधण्यात यावे, अशी सातत्याने मागणी होत होती. दरम्यान, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी पाठपुरावा केल्याने बांधकाम विभागाने शासकीय विश्रामगृहास मंजुरी दिली. त्यानंतर विश्रामगृह कोठे बांधावे असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, उपजिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुणकी रोडवरील शेतकरी शरद पवार, आनंद पवार यांच्या जागेची पाहणी करून ती निश्चित केली होती. त्यासाठी शासन नियमाप्रमाणे सर्व विभागांची परवानगी घेऊन १ कोटी २५ लाखांचा धनादेश देण्यात येऊन नोंदणी करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही जागा आपल्या ताब्यात घेतली असल्याने जळकोटच्या विश्रामगृहाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच निविदा प्रक्रिया होऊन बांधकाम सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.
जळकोट विश्रामगृहासाठी जागा घेतली ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:16 IST