उदगीरच्या नगराध्यक्षांना भाषणाची संधी का नाही
उदगीर नगरपालिकेवर भाजपचे वर्चस्व आहे. नगराध्यक्ष भाजपचेच. परवा शहरात पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत सामान्य रुग्णालयात सोहळा झाला. शिष्टाचारानुसार निमंत्रण पत्रिकेवर नगराध्यक्षांचे नाव होते. समारंभात शासकीय अधिकाऱ्यांबरोबर अनेक पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. मात्र, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे यांचे भाषण झाले नाही. स्वागतपर भाषण अथवा स्वागत घडले नाही. शहराच्या प्रथम नागरिकाला संधी का दिली नाही, अशी उदगिरात चर्चा रंगली आहे.
पाहणी करून कुठे निघाले; मदतीचे बघा...
पावसाने ताण दिला म्हणून पिके कोमेजली होती अन् शेवटच्या टप्प्यात काही मंडळात धो-धो बरसल्याने पिके पाण्यात गेली. ऊस, सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. त्याची पाहणी करण्यासाठी लोकप्रतिनिधी आपापल्या भागात फिरत आहेत. पाहणी करून गप्पा-गोष्टी करणाऱ्यांना शेतकरी जाग्यावरच पाहणी करून कुठे निघाले मदतीचे बोला, असे ठणकावत आहेत. त्यामुळे चिखलात रुतलेली पादत्राणे सावरत नेते पुढच्या शेतशिवाराकडे धावत आहेत.
वाहतूक पोलिसांना गूळ मार्केटची गोडी...
मुख्य मार्गांवर वाहने थांबवून वाहतुकीचा खोळंबा होऊ नये या उदात्त हेतूने लातूर शहरातील वाहतूक पोलीस गूळ मार्केट रस्त्यावर पाय रोऊन उभे असतात. जाणारा-येणारा चुकला की दंड ठोठावतात. कधी काळी केलेली चूक नव्या यंत्राच्या मेमरीत कायम राहत असल्यामुळे जुन्या दंडाचीही वसुली होते. त्यामुळे बसस्थानक ते गूळ मार्केट जोडणाऱ्या मार्गावर एसबीआय बँकेसमोर बेशिस्तीत उभारलेल्या वाहनांना लगाम लावणे पोलिसांना शक्य होत नाही. शेवटी त्यांनी तरी कुठे-कुठे पाहावे. परिणामी, गूळ मार्केटची रोडची लागलेली गोडी अनेक दिवसांपासून कायम आहे.
स्त्री रुग्णालयातील प्रसूती वेदना...
लातूरला सुसज्ज स्त्री रुग्णालय आहे. गुरुवारी सकाळी १० वाजता बाळंतपणासाठी दाखल झालेल्या रुग्णाला दिवसभर खाट मिळालाच नाही. रात्रही व्हरांड्यात काढावी लागली. दुसऱ्या दिवशी कसेबसे खाट मिळाला. त्यानंतर सलाईन लावून दिवसभर त्या रुग्णाला कोणी नीट पाहिले नाही, अशी त्याची तक्रारी होती. शेवटी रुग्णाच्या कळा कळवळा पाहून नातेवाइकांनी खासगी रुग्णालय गाठले.