कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, काही नागरिक अत्यावश्यक खरेदीच्या नावाखाली रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत सकाळच्या वेळी गर्दी होत आहे. त्यामध्ये काहीजण विनामास्क असतात. येथील नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यासाठी पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाने सोमवारी शहरातील महात्मा बसवेश्वर चौकात बॅरिकेड्स लावून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून ७ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
दुकानदारांसह १७ जणांवर कारवाई...
या पथकाने सोमवारी नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान सुरू ठेवल्यामुळे एका दुकानदारावर आणि विनामास्क फिरणाऱ्या १७ नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. ७ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. ब्रेक द चेनअंतर्गत संचारबंदी लागू आहे. विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरूच राहणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.